परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते, हे संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सचिन सिताराम पर्बत या युवकाने सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत गरिबीतून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सचिनने पोलीस प्रशिक्षणाची खडतर पायरी यशस्वीपणे पार केली असून, आता तो मुंबई येथील वरळी येथे पोलीस सेवेत रुजू झाला आहे.
सचिन पर्बत हा पानोडी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण (१० वी पर्यंत) पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी त्याने आश्वी खुर्द येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी पेलत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली.
सचिनची निवड पोलीस दलात झाल्यानंतर २३ जून २०२५ रोजी तो पोलीस ट्रेनिंग सेंटर, सोलापूर येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. नऊ महिन्यांच्या कठोर शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणानंतर, २४ मार्च २०२६ रोजी त्याने आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान दाखवलेली शिस्त आणि चिकाटीमुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २५ मार्च २०२६ रोजी सचिन पर्बत हा मुंबई येथील वरळी विभागात पोलीस पदावर कार्यरत झाला आहे. एका ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील मुलाने मुंबईसारख्या मोठ्या शहरात पोलीस दलात स्थान मिळवल्याने पानोडी गावासह संपूर्ण संगमनेर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सचिनच्या या यशामुळे पानोडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे .