आमदार अमोल खताळ यांनी लुटला मिरवणुकीत नाचण्याचा आनंद; लाखोंची उलाढाल
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे गाव असलेल्या मालुंजे येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यांची तीन दिवसीय यात्रा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी झाली. यात्रेवर पावसाने सावट धरले असले तरी, भाविकांच्या भक्तीपुढे पाऊस फिका पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसामुळे कुस्त्या रद्द, पैलवानांचा हिरमोड
यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती, काठी मिरवणूक आणि मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे कुस्तीचे मैदान चिखलमय झाले होते. परिणामी, ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला कुस्त्यांचा हगामा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे लांबून आलेल्या मल्लांचा हिरमोड झाला.

यावेळी संदीपराव घुगे यांनी मल्लांची दिलगिरी व्यक्त केली आणि “या वर्षी झालेली कसर पुढील वर्षी नक्कीच भरून काढू,” असे आश्वासन देऊन मल्लांना दिलासा दिला.
२८७ पायऱ्या चढून भक्तांनी घेतले दर्शन
यात्रेच्या शेवटच्या दिवशी पावसाचा जोर असूनही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे, लहान मुलांसह अनेक भक्त २८७ पायऱ्या चढून गडावर खंडोबाच्या दर्शनाला पोहोचले. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. दर्शनानंतर भाविकांनी यात्रेतील खेळणी, हलवाई आणि इतर स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी केली. एकाच दिवसात यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आमदार अमोल खताळ यांचा सहभाग
यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली ती दुसऱ्या दिवशी निघालेली काठी मिरवणूक. या मिरवणुकीत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी स्वतः सहभागी होत ग्रामस्थांसोबत ठेका धरला. ढोल-ताशांच्या गजरात आमदारांना नाचताना पाहून तरुणाईमध्ये मोठा उत्साह संचारला होता.

गावाकडच्या ओढीने चाकरमानी दाखल
ग्रामीण भागात यात्रा म्हणजे आनंदाचा सण असतो. नोकरी आणि व्यवसायानिमित्त शहरात राहणारे अनेक चाकरमानी आपल्या मुलाबाळांसह यात्रेसाठी आवर्जून गावी आले होते. पावसाने व्यत्यय आणला असला तरी, परंपरेनुसार पार पडलेल्या या उत्सवाने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.

Post Views: 15

