संगमनेर । झुंझार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या मालुंजे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवाचा वार्षिक यात्रोत्सव बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. निसर्गरम्य अशा उंच डोंगरावर वसलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे यांसह राज्यातील विविध भागांतून हजारो भक्तगण मालुंजे येथे दाखल झाले आहेत.

यात्रेच्या पहिल्याच दिवशी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींमध्ये निळवंडे, आश्वी, विरगांव, पिंप्री लौकी, अजमपूर, पानोडी, शेडगांव, हंगेवाडी यांसारख्या विविध गावांतील नामांकित बैलगाडा चालक आणि मालक आपल्या गाड्यांसह सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या शर्यतींमध्ये आश्वी खुर्द आणि विरगांव येथील बैलगाड्यांनी अंतिम फेरीत बाजी मारत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

माजी लोकनियुक्त सरपंच संदीपराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा कमिटीने या संपूर्ण महोत्सवाचे चोख नियोजन केले होते. बैलगाडा स्पर्धेचे ओघवते आणि उत्साहवर्धक सूत्रसंचालन खंडेराव आंधळे यांनी केले. शर्यतींमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात बक्षिसांचे वाटप करण्यात आले.


या सोहळ्याप्रसंगी भाजपा जोर्वे गट अध्यक्ष गोकुळ दिघे, महेश खेमनर, सुरेश नागरे, गुणा आंधळे, संभाजी डोंगरे, तात्यासाहेब  गायकवाड, दिपक घुगे पत्रकार राजेश गायकवाड यांसह अनेक स्थानिक नेते, रसिक, भाविक आणि बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डोंगरावरील निसर्गरम्य परिसर आणि ‘येळकोट येळकोट घेरी मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण मालुंजे परिसर दुमदुमून गेला आहे. पुढील काही दिवस या यात्रेचा उत्साह असाच कायम राहणार असून, प्रशासनाने आणि यात्रा कमिटीने भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *