अकोले : झुंजार न्यूज 

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या  जागेवर त्यांच्या पत्नी  माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांची बिनविरोध निवड झाली.

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला होता.या विजयात कै. अशोकराव भांगरे यांचा सिहाचा वाटा होता.त्यांच्या मुळे आदिवासी भागातून शेतकरी समृद्धी मंडळाला मोठे मताधिक्य मिळाले व या मंडळाला सर्व जागा जिंकता आल्या.स्वतः कै अशोकराव भांगरे अनुसूचीत जाती जमाती मतदार संघातून निवडून आले.नंतर त्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली.
उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जोमाने कामास सुरवात केली होती.कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या दैनंदिन कामाकडे लक्ष देता यावे म्हणून ते शेंडी सोडून अकोले येथे रहायला आले होते.तालुक्याच्या आदिवासी भागात दोन लाख टन ऊस निर्मितीचे त्यांचे उद्दिष्ट होते.त्या प्रमाणे काम करण्यास त्यांनी सुरवात केली होती.मात्र नियतीच्या मनात वेगळेच काही होते.त्यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागेवर संचालक पदाच्या जागी श्रीमती सुनिताताई भांगरे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली होती.

 कारखान्याचे उपाध्यक्ष पदाच्या निवडी करिता आज प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा अध्यासी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली.त्यामध्ये स्व. भांगरे यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांना संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व समृद्धी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते व संचालक मंडळाने आज घेतल्याने श्रीमती भांगरे यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी अविरोध निवड झाली.

कारखान्याच्या संचालक पदानंतर उपाध्यक्ष पदी श्रीमती भांगरे यांची निवड जवळपास निश्चित समजली जात होती. त्यानुसार आज ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, आ डॉ किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांचेसह सर्व संचालक, समृद्धी मंडळाचे प्रमुख नेते,कार्यकर्ते व भांगरे समर्थक उपस्थित होते.
कै. भांगरे यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भांगरे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांच्या  रिक्त जागी घेण्याची मागणी केली होती. नुकत्याच वाकी येथील एका कार्यक्रमातही माजी आमदार वैभवराव पिचड व श्रीमती सुनिता भांगरे एकत्रित असतांना संचालक पदानंतर आता उपाध्यक्षपदासाठीही श्रीमती भांगरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed