संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील घटना
संगमनेर : झुंजार न्यूज
उन्हाचे दिवस असल्याने डोहात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात ही दुर्घटना घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६ वर्ष, रा. धुळवाडची डोंगराची वाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि शुभम रावसाहेब कोटकर (वय २० वर्ष, रा. पिंपळे, ता. संगमनेर, ) अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. या संदर्भात मृत सोमनाथ जेडगुले यांचा मावस भाऊ विलास खंडू शिरतार (वय २४ वर्ष, रा. गोडसेवाडी, धांदरफळ ) याने दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोमनाथ कचरू जेडगुले आणि शुभम रावसाहेब कोटकर हे दोघेजण बुधवारी (ता.२६ एप्रिल) नांदुरी दुमाला शिवारातील नांदुरी फाटा येथे असलेल्या पाण्याच्या डोहावर मेंढ्या धुण्यासाठी गेले होते. मेंढ्या धुवत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने पाण्याच्या डोहातून दोघांनाही बाहेर काढून उपचारासाठी घुलेवाडी ता. संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आणण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे . यासंदर्भात लगेचच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घोडे पुढील तपास करत आहेत

