कोपरगाव | झुंजार न्यूज
एकेकाळी आपल्या सौंदर्याने व नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडून तमाशाचा रंगमंच गाजविणाऱ्या लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे कोपरगावकर वयोवृद्ध झाल्याने व त्यांच्या डोक्यावर घराची छप्पर नसल्याने त्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे समजताच भाजप प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे त्यांच्या मदतीला धावून गेल्या, त्यांना साडी-चोळी व आर्थिक स्वरुपात मदत करत शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घडऊन पुढील आरोग्य उपचार व्यवस्था करून द्वारका माई वृध्दाश्रम येथे शांताबाई यांच्या सध्या राहण्याची व्यवस्था करून त्यांना मायेचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता असे सो कोल्हे म्हणाल्या.

शांताबाई लोंढे यांना सरकारच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे ऊर्फ शांताबाई कोपरगावकर यांनी ३०-४० वर्षांपूर्वी आपल्या पहाडी आवाजाने व नृत्य कलेने रसिकांना मोहिनी घातली होती. सौंदर्य, आवाज, नृत्य या तीन गोष्टींवर त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी रसूल पिंजारी वडीतकर, भिका-भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू सिंधीकर, हरिभाऊ अन्वीकर, शंकरराव कोचुरे खिर्डीकर अशा खानदेशातील नामवंत तमाशा फडात काम केलेले आहे. त्यांनी सुंदर नृत्य व गायन करून आपल्या लाजवाब अदाकारीने उत्तर महाराष्ट्र, खानदेशातील अनेक तमाशा फड व मुंबईतील लालबाग परळचे हनुमान थिएटरही गाजवले होते. एकेकाळी वैभवात राहणारी ही लावणीसम्राज्ञी गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर भीक मागून अत्यंत बिकट अवस्थेत जगत होती. शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना हक्काचा निवारा नाही, त्या ७५ वर्षांच्या असून, त्यांचा लावणी गात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शांताबाईंचे वास्तव जीवन जगासमोर आले.

शांताबाई लोंढे यांचे कलेवरचे प्रेम कायम आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शांताबाई लोंढे यांच्यासारख्या वयोवृद्ध कलावंतांना आणखी काय मदत करता येईल, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी सांगितले
