संगमनेर । झुंजार न्यूज
मागील तीन महिन्यांपासून अशांत असलेल्या मणिपूर मधील हिंसाचार व महिलांवर झालेले अत्याचार याविरुद्ध संपूर्ण भारतभर संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत मनोवृत्ती विरुद्ध व या हिंसाचारांच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
मणिपूर मधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात धर्म पंथ काही नसून तो मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूर मध्ये सध्या महिलांविरुद्ध मोठे अत्याचार होत असून संपूर्ण भारतात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस अमानवीय घटना घडत आहेत.या विकृत मनोवृत्तीचा देशासह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र,अहमदनगर जिल्हा व संगमनेर मध्ये ही मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटनांबाबत मोठी संतापाची लाट असून संगमनेर तालुका व शहरातील सर्व महिलांचा भव्य निषेध मोर्चा बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
तरी या महिला मोर्चासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय हिंद महिला मंच व संगमनेर शहरातील महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
