पुणे । झुंजार न्यूज

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुणे शहराचं वेगळं महत्त्व आहे

आजचा दिवस हा लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा आहे. त्याचा सोहळा या ऐतिहासिक पुणे शहरात होतो आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की देशात पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. याच पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले. मोगलांचं संस्थान असेल किंवा यादवाचं संस्थान असेल पण शिवछत्रपतींचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. ते रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याच्या गौरवाचा एक भाग आहे.

शाहिस्तेखानाला पळवण्यासाठी शिवरायांनी पहिला सर्जिकल स्ट्राईक केला

अलिकडच्या काळात या देशातल्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी साठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आपण लोकमान्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी आलो. १८६५ मध्ये लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत यांनी रत्नागिरी सोडली आणि ते पुण्यात आले. ते नुसतं आगमन नव्हतं तर एक प्रकारची ठिणगी होती. त्यानंतर ती स्वातंत्र्याच्या मशालीचं रुप त्याने घेतलं.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *