नगर जिल्ह्यातील अनेक गावांत दुष्काळ

संगमनेर । झुंजार न्यूज 

नगर जिल्ह्यात अनेक गावांत यावर्षी कमी पावसामुळे दुष्काळ पडलेला आहे. पण तालुके दुष्काळी जाहीर झाले नसल्याने गावांनाही लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकऱी वंचित राहू नये यासाठी तालुका एवजी गाव हा निकष करावी अशी मागणी माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी केली.
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अनेक गावांत दुष्काळी स्थिती असतानाही दुष्काळ जाहीर झाला नाही. खरिपात पीकांचा फारसा लाभ मिळाला नाही. रब्बीत पेरण्याला अडचणी आहेत. नैसर्गिक आपत्ती, बदलते वातावरण या सगळ्या बाबीमुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. शेतकरी समाजात महत्वाचा असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांनी आधार देण्याची गरज असते. राज्यात यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नाही. रब्बी पेरणीच्या सुरुवातीलाही पाऊस झाला नसल्याचा मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. आत्ताच्या घडीचा विचार केला तर अनेक गावात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. गावगावांत पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे. पिण्याचे पाणी नसल्याने दूध व्यवसाय, पशुपालन या सगळ्या बाबी अडचणीत आल्या आहेत.

या सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाकडून शेतकऱ्यांना दुष्काळी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असते. शासनाने नुकतेच दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले आहेत, मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही तालुका हा निकष असल्याने दुष्काळग्रस्त जाहीर झाला नसलेल्या तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात एका तालुक्यामध्ये काही भागात चांगली स्थिती असते, तर काही भागात दुष्काळ असतो. त्यामुळे तालुका निकष दुष्काळ जाहीर करण्याला योग्य नाही. दुष्काळाचा लाभ द्यायचा असेल तर थेट गाव पातळीवरचे निकष महत्त्वाचे आहेत. गाव पातळीवर दुष्काळी निकष ठेवला तर कोणताही शेतकरी किंवा कोणतेही गाव दुष्काळी योजनांपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुष्काळी निकष बदलून ते गाव करावे अशी मागणी ही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *