राहुरी । झुंजार न्यूज
राहुरी तालुक्यातील गुहा येथे दोन वर्षांपासून सुरू असलेला धार्मिक स्थळाचा वाद काल (सोमवारी) पुन्हा उफाळून आला. काहींना मारहाण झाल्यामुळे दोन समाजांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले. गावात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. गुहा येथे दोन समाजांची धार्मिक स्थळे एकाच ठिकाणी आहेत. या धार्मिक स्थळांच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. एका धार्मिक स्थळी प्रत्येक गुरुवारी आरती व प्रत्येक अमावस्येला पूजा विधी, भजन, ग्रंथ पारायण व महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. त्यास दुसऱ्या समाजातर्फे वारंवार आक्षेप घेतला जात असल्याने वाद उफाळत आहे.
सोमवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी सात वाजता धार्मिक स्थळी पूजा विधी चालू असताना पुजारी व त्यांच्या सहायकाला एका समाजाने मारहाण सुरू केली. भजनी मंडळातील भक्तांनाही मारहाण झाली. ग्रंथ पारायण करणाऱ्या महिला भक्तांमध्ये हलकल्लोळ उडाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. मोठा जमाव घटनास्थळी जमला.पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने तणाव निवळला आहे. दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.
गुहा येथे आज (सोमवारी) सकाळी एका धार्मिक स्थळावररून दोन गटांत वाद निर्माण झाले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावात शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस उपअधीक्षक, श्रीरामपूर.
Post Views: 787
