संगमनेर । झुंजार न्यूज

दिवाळी सण आपल्याच घरी साजरा करण्यासाठी परगावी कामधंदा निमित्त असलेल्या प्रत्येकालाच आपल्या घराची ओढ लागलेली असते. ह्याच दिवाळी सणाच्या लगबगीत मात्र ऊसतोड कामगारांची साखर कारखान्याकडे जाण्यासाठी आवर सावर चालू असते. दळण दळून घेतल्या जाते, मसाले बनवून घेतले जातात, स्वयंपाकासाठी लागणारी भांडीकुंडी बांधली जातात सर्वच जीवनावश्यक वस्तूंची बांधाबांध झाल्यानंतर त्यांचा प्रवास चालू होतो  साखर कारखान्याच्या दिशेने राज्यात – परराज्यात. आशिया खंडातील सर्वात पहिला साखर कारखाना आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बु.चा आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा अहमदनगरच त्यामुळे आमच्याकडील प्रत्येक रस्त्यावरती ट्रक, ट्रॅक्टर बैलगाडी वरती ऊसतोड कामगारांची बि-हाड आम्हास पाहावयास मिळतात. त्यावेळी कवी वामनदादा कर्डक यांच्या “पोटाच्या खळगीसाठी बांधून बि-हाड पाठी, तांडा चालला.. तांडा चालला” या ओळी नक्कीच आठवतात. मुकादमा कडून घेतलेली उचल वेळेत फेडता यावी याकरता दिवाळी सणाकडे दुर्लक्ष करून हे ऊसतोड कामगार ऐन दिवाळी सणाच्या आसपास सुरू होणाऱ्या  गळीत हंगामा करता साखर कारखान्याकडे रवाना होत असतात. 
     
सध्या सगळीकडेच दिवाळीची धामधूम सुरू आहे. जिकडे तिकडे फटाक्यांचा दणदणाट आवाज आहे.  एका ऊसतोड कामगारांच्या अड्ड्यावरती गेलो असताना त्या ठिकाणी भयाण शांतता पहावयास मिळाली. पाचट , प्लास्टिक कागद व चटईच्या साह्याने बनवलेल्या छोट्या छोट्या कोप्यांची दरवाजे लावलेली होती. इथे ना दारापुढे सडा रांगोळी , ना दिव्यांची रोषणाई. येथे दिवसा ही मला काळोख दिसला इथली सर्वच माणसं ऊस तोडणीसाठी शेतात गेलेली होती. कोप्या पुढे दोन वयोवृद्ध आजीबाई गप्पा मारत बसलेल्या होत्या. बाजूलाच एक लहान मुलगा जेवण करत होता सहजच त्याच्या ताटात डोकावलो असता लाल मिरचीची चटणी व बाजरीची भाकर तो खात होता. दिवाळी सणाच्या शेव, चिवडा ,लाडू ,करंजी, शंकरपाळे, चकली इत्यादी पदार्थातील एकही पदार्थ त्याच्या ताटात नव्हता. ना दिवाळीचा फराळ, ना नवीन कपडे, ना फटाके तरीही तो समाधानी दिसला. ती तिखट चटणी खाताना त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येत होते परंतु ही सर्व परिस्थिती बघून माझ्याही डोळ्यात पाणी आले. चार-पाच दिवसांपूर्वी मी शिर्डीतील मॉलमध्ये गेलो असताना तिथे महागड्या गाड्यातून आलेली अनेक माणसं चाळीस पन्नास हजार रुपयांचा दिवाळीचा किराणा भरताना मी बघितली आणि ही आजची परिस्थिती बघितली किती ही तफावत किती ही गरीब श्रीमंतातील दरी. गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. मी त्या श्रीमंत लोकांना दोष नाही देत त्यांनी ती श्रीमंती कष्टाने कमवली आहे परंतु येथे कितीही कष्ट केले दिवसाची सुरुवात रात्री दोन अडीच वाजता केली जात असली तरीही ती श्रीमंती गाठण्यासाठी यांच्या अनेक पिढ्या बरबाद होतील. मुकादमाची उचल फेडता फेडताच अनेक पिढ्या खपल्या आहेत. 
कष्ट तरी किती करावे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात , पदमश्री डॉ विखे पाटील ,कोपरगांव ,  संजीवनी , श्री गजानन महाराज , तनपुरे , गणेश या साखर कारखान्याच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून या ऊसतोड कामगारांचे कष्टमय जीवन जवळून बघितले जात आहे. दरवर्षी ऐन परीक्षेच्या वेळेसच गळीत हंगामासाठी शिक्षणाची हेळसांड झालेल्या ऊसतोड मजुरांच्या या कोवळ्या मुलांकडून आपण कुटुंबाला भविष्यात  प्रगतीपथावर नेण्याची अपेक्षा तरी करू शकतो काय ? तरीही अशा कठीण प्रसंगातून भरारी घेतलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे अभिनंदनच. गोड साखर निर्मितीत ज्यांचे आयुष्य कडू होत आहे अशा ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात गोडवा निर्माण व्हावा हीच ह्या दिवाळी सणानिमित्त अपेक्षा…
          
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *