संगमनेर । झुंजार न्यूज

१९३९ चा जन्म असलेल्या रमाकांत गायकवाड यांचे आज २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आणि आंबेडकरी चळवळीतला एक तारा निखळला. हि घटना मनाला हेलावून सोडणारी होती. जूने जाते नेतृत्व काळाच्या ओघात पडद्याआड जाणे हे निसर्ग नियमाला जरी मान्य असले तरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर तो मोठा आघात असतो. तो पचवणे तसे आवघडच.

रमाकांत गायकवाड यांनी बालपणापासूनच आंबेडकरी चळवळ पाहिली व अनुभवलेली असल्याने, त्यांच्या मनावर तिचा ठसा उमटने तसे साहजिकच होते व तो उमटलाही. म्हणून तर हा माणूस आयुष्यभर आंबेडकरी चळवळीची निशाणी म्हणून निळी टोपी, निळा सदरा व सफेद पायजमा याच पोशाखात वावरला. यामुळेच त्यांना शेवटचा निरोपही त्याच पेहरावात भावपूर्ण अंतकरणाने देण्यात आला.

रमाकांत गायकवाड यांनी दलित पँथरच्या चळवळी पासून ख-या अर्थाने आपल्या कार्याला सुरुवात मा. रामदास आठवले यांच्या बोटाला धरून केली. दलित पँथरच्या आपल्या गावातील शाखा उदघाटनाला रामदास आठवले यांना आणले. पण या शाखा उदघाटनाची गम्मत म्हणजे त्यावेळी रामदास आठवले काही राजकारणात नव्हते. तर ते एक साधे पॅंथरचे लढवय्या खंदे वीर होते व पायाला चाके लावून ते महाराष्ट्रभर शाखा उदघाटनासाठी फिरत होते. फाटक्या कपड्यातील व फाटक्या खिशातील कार्यकर्त्यांना संगती घेऊन व देतील ती बिदागी घेऊन पॅंथर चळवळीला वाहिलेला माणूस म्हणजे रामदास आठवले. यांना गावात आणले, उदघाटन केले पण रामदास आठवलेंना मुंबईला जायलाही भाड्याला पैसे द्यायला रमाकांतकडे पैसे नव्हते. यामुळे रामदास आठवले दोन दिवस देवठाण गावात मुक्कामी राहिले. मिळेल ते जेवन जेवले. कधी पिठले भाकर तर कधी मासे. असा त्यांचा पाहुणचार. झोपायला गोधडी आणि बसायला पडवी अशी त्यांची ठेप. पण हे काही रमाकांत गायकवाड यांना पहावेना. सरतेशेवटी एक दिवस संध्याकाळच्या वेळी त्यांनी मला गाठले व म्हणाले ” दिपक, आठवले साहेबांना मुंबईला जायला भाड्याच्या पैशांचे काय करायचे? ” असा मला बारीक चेहरा करून प्रश्न टाकला. त्यावेळी मी काॅलेजला जाणारा विद्यार्थी. यामुळे माझाही खिसा फाटकाच. पण बराच विचार करून मी रमाकांत तात्यांना म्हटले ” तात्या, आठवले साहेबांना भाड्यावारी गावात ठेऊन आपण पार आपल्या समाजाची चव घातलीय. आता एक कर तुझा शेळ्यांतला एक बोकड्या वीक. ते पैसे आठवले साहेबांना देऊ आणि त्यांना पाठवून देऊ मुंबईला ” यावर रमाकांत तात्या तोंडावर हात ठेवत म्हणाले ” आरे असं केलं तर सखी ( बायको) मला कच्चा ना खाईल. ” यावर मी शांत झालो. पण परत डोकं खाजवत म्हणालो.
” एक कर. तू शेळ्या कुठे बांधतोय तेवढं मला सांग. ”
” सांगून तू काय करशील? ”
” अहो तात्या, आपण एक काम करू. मी रात्रीच्या बोकड चोरून नेतो व दिवस उगायच्या आत तो आपल्या गावच्या मुसलमानाला विकून टाकू.त्याचे पैसे आठवलेंना देऊ आणि त्यांना देऊ पहिल्याच गाडीने मुंबईला बसवून. तू फक्त रात्रीचा वाघाने बोकड नेला एवढंच सखीला सांग. मग पुढचे मी पहातो. “
या पद्धतीने आम्ही आठवलेंना भाड्याने पैसे दिले व हाती घेतलेली मोहिम फत्ते केली.

यानंतर रमाकांत गायकवाड नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणूकीला उभे राहिले. तेही अपक्ष. त्यावेळी काॅंग्रेसकडून डॉ. वसंत पवार, शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे व तिसऱ्या आघाडीतर्फे एन. एम. आव्हाड अशी तिरंगी लढत होती. सर्वच उमेदवारांचा प्रचार तगडा. गावात प्रत्येक उमेदवाराच्या गाड्या फिरायच्या. पण रमाकांत यांच्या प्रचाराला गाडी नाही की प्रचाराला माणूस सुद्धा नाही. रमाकांत हाडाचे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असल्याने ते एकटेच गावात प्रचार करायचे. पण विशेष म्हणजे या निवडणुकीत रमाकांत गायकवाड यांना निवडणूक चिन्ह म्हणून ” ढाल तलवार ” मिळाली. आणि काय आश्चर्य, त्यावेळी रमाकांत गायकवाड यांना संपूर्ण मतदारसंघातून चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. पण हा आंबेडकरी चळवळीचा शिलेदार अकरा उमेदवारात चौथ्या क्रमाकांचे पास झाला. धनवंतांनी माणि गिळले. पण रमाकांतराव सर्वांनाच पुरून उरले. संपूर्ण नाशिक मतदारसंघात रमाकांत गायकवाड नावाची एकच चर्चा रंगली. हा माणूस आहे तरी कोण व कसा? हे पहाण्यासाठी राजकीय मंडळी देवठाण गावात येऊ लागली.

असं हे खंबीर बाण्याचं व भीमाच्या वाणीचं सोज्वळ, दिलदार, लढवय्य आंबेडकरी नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या कार्याला श्रद्धेची श्रद्धांजली, आदराची आदरांजली व पुष्पांची पुष्पांजली वाहतो व थांबतो.

जयभीम. नमोबुद्धाय.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed