अत्यंत दुःखदायक घटना- आमदार थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज
घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं प्रशासनाला केल्या असून तातडीने मदत पोहोचवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . ट्रक चालकाला डूलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला. यामुळे तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊ वारकरी जखमी झाले.
हे वृत्त समजतात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने अमृत उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांना फोन करून मदतीच्या सूचना दिल्या . तर मा.आ डॉ सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे , इंद्रजीत भाऊ थोरात यांनीही तातडीने या घटनेची माहिती घेऊन जखमींना मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साखर कारखाना, दूध संघ यांच्यासह पठार भागातील कार्यकर्त्यांनी तातडीने जखमींना मदत पोहोचून वारकऱ्यांना दिलासा दिला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत आमदार थोरात यांनी तातडीने सर्वांशी संपर्क साधून प्रशासनालाही याबाबत सतर्क राहून मदतीच्या सूचना केल्या आहेत.
यशोधन कार्यालय व संपर्क यंत्रणेने सर्व भाविकांच्या नातेवाईकांची संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली तसेच दिंडीतील सर्वांना मदत करत मोठा दिलासा दिला आहे…
अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतील वारकऱ्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून या सर्व वारकऱ्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. या सर्व परिवारांच्या दुःखात आपण सामील असून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे
