कोपरगांव । झुंजार न्यूज
क्रोध, दोष ठेवुन केलेल्या भक्तीचे फळ मिळत नाही तेंव्हा मनुष्यांने आपल्यातील षडविकारांचा त्याग करून सेवा करावी असे असे प्रतिपादन बाजाठाणच्या रामदरबार आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. हरिशरणगिरी महाराज यांनी केले.
कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळयानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन गुरूवारी त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
ह. भ. प. हरिशरणगिरी महाराज पुढे म्हणाले की, ही सृष्टी परमेश्वराने बनविली आहे. त्याची आठवण प्रत्येकाने ठेवावी. सज्जनगडस्थीत समर्थ रामदास स्वामी यांनी परमार्थ, राष्ट्रप्रेम, स्वधर्मनिष्ठा प्रसारासाठी महाराष्ट्र पिंजुन काढला. त्यांना साक्षात प्रभु श्रीरामचंद्र यांच्याकडुन प्रेरणा मिळाली होती. मनाच्या श्लोकातुन त्यांनी समाजउध्दाराचे महान कार्य केले. हीच प्रेरणा घेत भिलवडी सांगलीचे रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांनी कोकमठाण पंचक्रोशीत भक्तांच्या हाकेला धावुन त्यांना ज्ञानमार्गाची जाणिव करून दिली. येथील रामदासीबाबा भक्त मंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी हे तनमनधनांने अध्यात्मीक कार्यासाठी झटतात हा एकोपा असाच कायम ठेवत स्वतःबरोबरच गांवच्या प्रगतीत योगदान द्यावे.
चौकट
नादब्रम्हची तीनखणीत सेवा
पिंपळस राहाता येथील नादब्रम्ह वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांनी लयबध्द पध्दतीने रामदासीबाबांच्या तीनखणीत दिलेल्या सेवेचे सर्वांनीच कौतुक केले. संतोष महाराज दिक्षीत यांनी हिरे घडविले. किर्तन श्रवणांस महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.
