शिर्डी । झुंजार न्यूज

 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई मार्फत शिर्डी येथे ‘निमंत्रित पत्रकारां’साठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा येत्या बुधवारी, दिनांक 6 मार्च 2024 रोजी शिर्डीतील हॉटेल के.बी.ज् ग्रँड येथे सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत होईल.

 

 

‘आध्यत्मिक पर्यटन आणि त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ ‘या विषयावर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजता  होईल. या कार्यक्रमास शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्री साईबाबा सेवा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पत्र सूचना कार्यालय, पुणेचे उपसंचालक महेश अय्यंगार आणि माध्यम अधिकारी हर्षल आकुडे माहिती आणि सहाय्यक सोनल तुपे हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील. 

 

 

कार्यशाळेदरम्यान, सुरुवातीला ‘शिर्डीतील पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारचे सहाय्य आणि एमटीडीसीचे प्रयत्न’ या विषयावर एमटीडीसी, नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, ‘आध्यत्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ यमाजी मालकर, तसेच ‘विकास पत्रकारिता आणि त्याचे ग्रामीण भागातील महत्त्व’ या विषयावर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांचे सादरीकरण होणार आहे. 

 

पुढील सत्रात, ‘शिर्डीतील पर्यटन विकास : बँकांची भूमिका,’ या विषयावर शिर्डीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद दहिफळे मार्गदर्शन करतील. यासोबत शासकीय योजनांच्या लाभार्थींचे अनुभव कथन हे सत्र देखील असणार आहे. 

 

 

तर, शेवटच्या सत्रात ‘ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल’ या विषयावरील पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी हर्षल आकुडे यांच्या सादरीकरणाने कार्यशाळेचा समारोप होईल.

 

 

भारत सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचे कार्य करणारी पत्र सूचना कार्यालय ही एक महत्वपूर्ण संस्था आहे. शासकीय योजनांना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यम यांच्यातील मुख्य दुवा म्हणून पीआयबी हे कार्यालय काम करत असते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *