संगमनेरातील गट, गणांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहिर !
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट- गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या हालचालींना गती आला आहे. गट-गणांनुसार आरक्षण जाहीर होताच, निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील गट गणांची अतिम प्रभाग रचना नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. यात संगमनेर तालुक्यातील गट गणांचा समावेश आहे. येथे एक गट व दोन गण वाढल्याने इच्छुकांना आता संधी मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्यामुळे सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. गट गणातील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. श्रीगणेशोत्सवामुळे काहीशी रखडलेल्या या प्रक्रियेला आता वेग आला आहे.
या निवडणूक प्रक्रियेत विद्यमान आमदार अमोल खताळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कशी संधी देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
समनापूर गट व गण, निमोण गट मालदाड, सायखिंडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, पळसखेडे, पिंपळे, कहें, सोनेवाडी, काकडवाडी, नात्रज दमाला, निमोण, समनापुर, सुकेवाडी, कुरण, निभाळे, खांजापूर, पारेगाव खुर्द, सोनोशी तर,
साकुर गट व गण; पिंपळगाव देपा गण वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी, कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, साकुर, जांभूळवाडी, नांद्र खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी असे आहेत.
विखे, थोरात, खताळांमध्ये रंगणार दुरंगी सामना
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार अमोल खताळ असा दुरंगी सामना रंगणार आहे, मात्र माजी मंत्री थोरातांनी निवडणूक कार्यक्रमाची वाट न पाहता, संपूर्ण तालुक्यात अगोदरचं यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुती कशाप्रकारे निवडणूक हाताळते, यावरचं यश सर्व अवलंबून असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मित्र पक्षांना कशाप्रकारे कार्यकर्त्यांना सामावून घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काहींना सोईस्कर.. काहींना अडचण..!
दिवाळी अगोदर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारी करीत आहे. संगमनेर तालुक्यातील गट-गणात काहीसा बदल झाला आहे. यामुळे आता काहींना हा गट- गण सोईस्कर झाले आहेत, तर काहींची मात्र अडचण होणार आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. गावोगाव, वाड्या, वस्त्यांवर ते संपर्क वाढवित आहेत.
राजकीय हालचालींना वेग ! अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य उमेदवारांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. एकूणच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी शासकीय पातळीवर होणारी तयारी पाहता, गट- गणांचे आरक्षण जाहीर होताच, निवडणूक कार्यक्रम लवकरचं जाहीर होईल. याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, मात्र अंतिम प्रभाग गट- गणांची प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात राजकीय हालचालींना मात्र आता वेग आला आहे.