नंदीहिल्स । झुंझार न्यूज

एसएमबीटी कॅम्पस (नंदीहिल्स) येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह एसएमबीटी परिवारातील सर्व सदस्य, सहकारी आणि हितचिंतक एकत्र आले. या ‘पाडवा स्नेहभेट’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने वर्षानुवर्षांची जुनी नाळ, नातं आणि निष्ठा पुन्हा एकदा अनुभवल्याचे दिसून आले.

 

 

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “एसएमबीटीची ही प्रवासगाथा आज ज्या उंचीवर पोहोचली आहे, ती या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या निःस्वार्थ सेवेमुळे, समर्पणामुळे आणि अखंड परिश्रमामुळे शक्य झाली आहे. जेव्हा हे स्वप्न एका ओसाड माळरानावर रुजवले, तेव्हा त्याच्या अंकुराला यशाचे जल देण्यासाठी अनेक हात निःस्वार्थ पुणे कार्यरत होते. आज त्या सर्वांचा मी आभारी आहे.

 

थोरात यांनी पुढे नमूद केले की, एसएमबीटी ही केवळ एक संस्था नाही, तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा, रुग्णांचा आणि पालकांचा विश्वास बनली आहे. आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत संस्थेचे कार्य हे समाजसेवा, निष्ठा आणि विकासाचे प्रतीक आहे.

 

 

या प्रसंगी थोरात यांनी एसएमबीटीच्या स्थापनेपासून आजवर योगदान देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, वाढवण बंदर जोडले गेल्यानंतर या परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल, यावरही उपस्थितांमध्ये चर्चा झाली. दिवाळी हा आपुलकीचा, आनंदाचा आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याचा सण आहे. आजची ‘पाडवा स्नेहभेट’ ही त्याच भावनेचे सुंदर प्रतीक ठरली, असे थोरात यांनी सांगितले.

या स्नेहभेटीमुळे एसएमबीटी कुटुंबातील सदस्यांना एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *