झुंझार न्यूज 
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२५

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि सहा दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महान अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे आज (सोमवारी) मुंबईत दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेमाचा एक तेजस्वी तारा निखळला असून, संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्रजींची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. श्वसनाचा त्रास आणि वयोमानापरत्वे उद्भवणाऱ्या आजारांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे पुत्र सनी देओल, बॉबी देओल तसेच पत्नी हेमा मालिनी आणि संपूर्ण देओल कुटुंब या दुःखाच्या प्रसंगी सोबत आहेत.

 

चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत

 

धर्मेंद्रजींच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे . पंजाबच्या एका साध्या खेड्यातून येऊन मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा हा अभिनेता केवळ एक स्टार नव्हता, तर ते अभिनयाची एक चालती-बोलती संस्था होते.

 

 

‘दिल भी तेरा हम भी तेरे’ (१९६०) या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘फूल और पत्थर’, ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘धरम वीर’, ‘सीता और गीता’ आणि ‘अपने’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘शोले’मधील त्यांचा ‘वीरू’ आजही प्रत्येक सिनेरसिकाच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या अभिनयात एकीकडे अक्शनचा तडका होता, तर दुसरीकडे कमालीचा साधेपणा आणि विनोदबुद्धी होती.

 

मान्यवरांकडून श्रद्धांजली

त्यांच्या निधानाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, “भारतीय संस्कृती आणि अभिनयाचा एक जाज्वल्य वारसा आपण गमावला आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या लाडक्या ‘धर्मेंद्र पाजीं’ना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

कुटुंब आणि वारसा:

धर्मेंद्रजी केवळ एक महान अभिनेतेच नव्हते, तर ते एक संवेदनशील कवी आणि शेतीवर मनापासून प्रेम करणारे साधे माणूस होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी देओल, मुली ईशा, आहाना, विजेता, अजीता आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

चाहत्यांची अलोट गर्दी:

 

त्यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून, प्रत्येक जण आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमला आहे.

 

धर्मेंद्रजी जरी देहाने आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांचे चित्रपट, त्यांचे अजरामर संवाद आणि त्यांचे हसरे व्यक्तिमत्त्व भारतीयांच्या मनात सदैव अमर राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अलविदा, धर्मेंद्र पाजी!”

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *