आश्वी | झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शेडगाव परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, या संकटसमयी महाराष्ट्राचे लोकनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या तत्परतेमुळे शेडगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


शेडगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब व तारांचे नुकसान झाल्याने गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प झाली होती. कडाक्याच्या उन्हात पाणी नसल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. ही बाब लक्षात येताच, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आणि चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा केला.

बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार, राजहंस संघामार्फत शेडगावसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर तातडीने रवाना करण्यात आला. हा टँकर गावात दाखल झाला असून, यामुळे ग्रामस्थांची पाण्याची वणवण थांबली आहे. ऐन गरजेच्या वेळी राजहंस संघ आणि थोरात कुटुंबियांकडून मिळालेल्या या मदतीमुळे शेडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


याप्रसंगी बोलताना सौ शितल उगलमुगले सांगितले की, “वादळामुळे वीज गेल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, डॉ. जयश्री थोरात यांनी आमची अडचण ओळखून तातडीने टँकर उपलब्ध करून दिला. लोकनेता असावा तर असा, जो संकटकाळात धावून येतो.”


राजहंस संघाच्या या तत्परतेबद्दल शेडगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात आणि रणजितसिंह देशमुख यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *