“तुमचे असणे आमच्यासाठी सर्वकाही होते… ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते. आज सर्व काही पदरी आहे, पण फक्त तुमची उणीव आम्हाला पदोपदी भासत आहे.”
अशा अत्यंत भावूक शब्दांत नागरे परिवाराने आपल्या कुटुंबप्रमुखाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील कै. बाबुराव भिवंजी नागरे यांचे शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ नागरे परिवारावरच नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
संघर्षातून उभारले आदर्श जीवन
कै. बाबुराव नागरे ऊर्फ ‘बाबुराव पाटील’ यांचे जीवन म्हणजे संघर्षाची एक मोठी गाथा होती. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला. आयुष्यात अनेक संकटे आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी मुलांना केवळ शिकविलेच नाही, तर त्यांच्यावर उत्तम संस्कारांची शिदोरीही दिली. त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे, त्यांचा मोठा मुलगा आज उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुलांच्या यशातच त्यांनी स्वतःचे समाधान मानले.
संयमी आणि धार्मिक व्यक्तिमत्व
बाबुराव पाटील हे केवळ नावानेच ‘पाटील’ नव्हते, तर त्यांचे व्यक्तिमत्वही तितकेच वजनदार आणि आदराचे होते. अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव ही त्यांची ओळख होती. गावात किंवा समाजात कोणताही वाद असो, बाबुराव पाटील आपल्या शांत स्वभावाने तो सोडविण्यास पुढाकार घेत. त्यांची धार्मिक आणि सामाजिक वृत्ती सदैव इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असे. देव-धर्मावर त्यांची नितांत श्रद्धा होती, त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या दशक्रिया विधीलाही धार्मिक वारशाची जोड देण्यात आली आहे.
कै. बाबुराव भिवंजी नागरे यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता पानोडी (ता. संगमनेर) येथील हनुमान मंदिरासमोर संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज आव्हाड यांचे विशेष प्रवचन होणार आहे. या प्रवचनातून बाबुरावजींच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल.
त्यांच्या पश्चात पत्नी गं.भा. हिराबाई नागरे, मुले श्री. राजेश नागरे आणि श्री. सुदाम नागरे यांच्यास ग. भा. रतनाबाई भाऊसाहेब फड ( मुलगी ) सौ. कल्पना अशोक आघाव ( मुलगी ) सौ. बेबी दादासाहेब चकोर ( मुलगी ) श्री. भाऊसाहेब कारभारी नागरे ( पुतण्या ) श्री. प्रसाद माधव नागरे ( पुतण्या ) श्री पुंजाहरी गोविंद नागरे ( भाऊ )पुतणे, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा मोठा गोतावळा आहे. नागरे परिवाराचा आधारवड कोसळल्याने सर्वजण पोरके झाले आहेत. बाबुराव पाटलांनी लावलेल्या संस्कारांच्या वृक्षाची सावली त्यांच्या पुढच्या पिढीला सदैव मार्गदर्शन करत राहील, हीच त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.