वैभव गायकवाड यांची ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये अधिकारी पदी निवड

आश्वी । झुंझार न्यूज

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची मोठी शिखरे सर करू शकतात, हे संगमनेर तालुक्यातील व शिर्ड  विधानसभा मतदारसंघातील आश्वी खुर्द येथील वैभव गंगाधर गायकवाड यांनी सिद्ध केले आहे. वैभव यांची देशातील नामांकित अशा ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये बँक अधिकारी पदी निवड झाली असून, त्यांनी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण आश्वी खुर्द परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैभव गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण त्रिमूर्ती (नेवासा) येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन, आश्वी खुर्द येथे पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी कृषी क्षेत्र निवडले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत असलेल्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड (संगमनेर) येथून त्यांनी आपली पदवी (B.Sc. Agri) पूर्ण केली.


बँक ऑफ बडोदामध्ये अधिकारी होण्यापूर्वी वैभव यांनी बँकिंग क्षेत्रात मोठा अनुभव गाठला आहे. त्यांनी अहिल्यानगर येथे ‘बंधन बँके’त ३ वर्षे आणि नाशिक येथे ‘कोटक महिंद्रा बँके’त ४ वर्षे यशस्वीरित्या काम केले आहे. खाजगी बँकांमधील कामाचा अनुभव गाठीशी असतानाच त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले होते.


नोव्हेंबरमध्ये झालेल्या या अत्यंत कठीण परीक्षेत संपूर्ण भारतातून सुमारे २.५ ते ३ लाख परीक्षार्थी २,५०० जागांसाठी बसले होते. महाराष्ट्रासाठी केवळ ४८५ जागा उपलब्ध असताना वैभव यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या स्पर्धेत यश मिळवून ‘बँक अधिकारी’ (Scale I) म्हणून आपले स्थान निश्चित केले.


वैभव गायकवाड यांनी आपल्या यशाचे श्रेय दिवंगत वडील कै. गंगाधर नामदेव गायकवाड यांच्या आशीर्वादाला आणि आई श्रीमती शोभा गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तसेच बहीण सौ. भावना सुभाष तांबे, भाऊ मोहित गंगाधर गायकवाड, चुलते प्रकाश नामदेव गायकवाड, मामा अशोक भिमराव तोरडमल आणि संपूर्ण गायकवाड कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.


या प्रवासात त्यांना मित्र परिवाराचीही मोठी साथ लाभली. यामध्ये विक्रम गायकवाड, संदीप म्हाळू गायकवाड, संपत भुसाळ, सुयोग डुबे, विजय मांढरे, सागर सोनवणे, दिपक दातीर, सचिन गायकवाड, सचिन बोंद्रे व इतर मित्रांचा समावेश आहे.


एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने बँकिंग क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे आश्वी खुर्दच्या वैभवात भर पडली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वैभव गायकवाड यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *