आश्वी । झुंजार न्यूज
आमची प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिच्या कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानाची हरएक प्रकारे सदोदित भरभराट व्हावी या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी शाहू महाराजांची आज्ञापत्रे त्यांच्या लोकनिष्ठेची आजही साक्ष देतात. शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचे शिक्षण,अस्पृशतानिर्मुलन,शेतकरी हिताचे निर्णय, आरक्षण याद्वारे सामजिक न्याय करून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली असे प्रतिपादन अनिल मुन्तोडे यांनी केले.
संयुक्त जयंती महोत्सव समिती आश्वी आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मुन्तोडे म्हणाले भारतीय संविधानाची लेटर आणि स्पिरीट अमलबजावणी सत्तर वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही उद्देशिकाच्या जवळपास पोहचण्यात आलेले अपयश झाकता येत नसताना कायद्यातील उणीवा ठळकपणे दिसून येतात. यावेळी मंचावर आदर्श पोलीस पोलीस पाटील राज्य पुरस्कार विजेते बापूसाहेब गायकवाड,मोहित गायकवाड, शीला संसारे,संगीता शिंदे,छ्बन मुन्तोडे व विकास भडकवाड उपस्थित होते. जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवण्यासाठी संयुक्त जयंती महोत्सव समितीचे प्रबोधन कार्य महापुरुषाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी असल्याचे सचिव राजेंद्र मुन्तोडे प्रास्तविक भाषणात सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंचावरील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार घालून प्रतिमापूजन केले.
शीला संसारे यांनी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला. कोरोना सारख्या महामारीतून आपण सहीसलामत वाचलो असून आपले उर्वरित आयुष्य आपण समाजकार्यात लावले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. संगीता शिंदे यांनी लोकांना शाहू महाराज व त्यांचे कार्य लोकांना माहित नसल्याची खंत व्यक्त केली .शाहू महाराजांचे कार्य लोकापर्यंत पोहोचवणे हि बुद्धीजीवी वर्गाची जबाबदारी असल्याची त्यांनी सांगितले. उध्दरली कोटी कुळे या वामनदादा कर्डक यांच्या गीताचे गायन करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली व वातावरणात चैतन्य निर्माण केले.छबन मुन्तोडे म्हणाले कि महापुरुषांना देवत्व बहाल करून महापुरुषांच्या प्रेरणा संपवण्यासारखे असून त्याच्या विचारात समाजाची पुनर्रचना करण्याचे सामर्थ आहे. यावेळी रंजनाबाई मुन्तोडे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ आश्वी येथील बुद्ध विहारास साउंड सिस्टीम भेट दिल्याबद्दल तसेच छबन मुन्तोडे यांच्या भोजन दानाबद्दल त्यांचा गौरव करून सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन विकास भडकवाड यांनी तर साधना मुन्तोडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी आश्वी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन मुन्तोडे, एकनाथ मुन्तोडे , भागवत मुन्तोडे ,बंडू मुन्तोडे, प्रतिक मुन्तोडे,कैलास मुन्तोडे,प्रसाद मुन्तोडे,गौरव मुन्तोडे, कैलास पगारे,सुरज मुन्तोडे, रेणुका मुन्तोडे,काजल मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, अलिशा मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
