बंधारे, तलाव तुडूंब; शेती पाण्याचा प्रश्न लागला मार्गी
राहाता l झुंजार न्यूज
निळवंडे धरणातून सोडलेले ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे जिरायती भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. या पाण्यामुळे गावातील बंधारे, पाझर तलाव भरले आहेत. त्यामुळे या क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी जलपुजन करुन व्यक्त केला आहे. केलवड येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले.
निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असला तरी, अद्यापही धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचीही शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना सोडण्याच्या सुचना जलसंपदा विभागाच्या आधिका-यांना दिल्या होत्या. यामुळे कालव्यातील पाण्याचा मोठा लाभ लाभक्षेत्रातील जिरायती भागाला झाला आहे. या ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे गावातील पाझर तलाव, बंधारेही भरले गेल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली. त्यामुळे विखे यांच्या पाणी सोडण्याबाबतच्या निर्णयाने समाधान व्यक्त होत आहे.
अद्यापही तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परंतु धरणं भरल्याचे समाधान आहे. ओव्हर फ्लोच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पुढाकार घेवून जलसंपदा विभागाच्या आधिका-यांना कालव्यातून पाणी सोडण्याची सूचना आपण दिल्या होत्या. शेवटच्या गावाला पाणी मिळेल, असे नियोजन करण्यास आपण आधिकाऱ्यांना सांगितले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य
Post Views: 742

