आमदार अमोल खताळ; पोलिस दलात निवड झालेल्या तरूणांचा सत्कार

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

ग्रामीण भागातील युवकांनी कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर पोलिस दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामागे कुटुंबियांचे त्याग, कष्ट व सातत्यपूर्ण पाठबळ तितकेच महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.

 

संगमनेर तालुक्यातील डोळासने गावाअंतर्गत धुमाळवाडी येथील महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेले गणेश रावसाहेब भागवत, योगेश बारकू धुमाळ, विजय प्रभाकर भोईटे, धनंजय सिताराम गांजवे आणि वृषभ यशवंत सुपेकर या तरुणांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, सूर्या करिअर अकॅडमीचे प्रमुख समीर काकड, गणेश सुपेकर, बाबाजी मोरे, दत्ता गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, पोलिस दल हे समाजातील कायदा व सुव्यवस्था राखणारे महत्त्वाचे अंग आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सेवा करताना या तरुणांनी गोरगरीब, वंचित व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे. तसेच, नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संवेदनशीलतेने जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सत्कारमूर्ती तरुणांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय आणि मार्गदर्शकांना दिले. गावातील युवकांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed