संगमनेर । झुंजार न्यूज  

 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या  39 व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शनिवार दि.25 रोजी दुपारी 4.30 वा. विधिमंडळ पक्षनेते तथा मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व  चित्रपट दिग्दर्शक तथा ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, मा. आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे उपस्थितीत अभिवादन व काव्यसंध्या हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जात असून या निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवी,साहित्यीक यांचे व्याख्याने आयोजित केले जातात.

हे वर्ष स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 39  व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक (दि.25) रोजी दुपारी 4.30 वाजता अमृतवाहिनी मॉडेल स्कूल च्या प्रांगणात यशवंततीर्थ येथे माजी मंत्री व विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी तथा चित्रपट दिग्दर्शक वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची काव्यसंध्या व प्रकट मुलाखत होणार आहे.सुप्रसिद्ध शेतकरी कवी भरत दौंडकर ही प्रकट मुलाखत घेणार आहेत. मुलाखतीसह काव्य मैफिल  होणार असल्याने संगमनेरच्या साहित्य प्रेमींना यावेळी मोठी मेजवानी मिळणार आहे.

याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,लक्ष्मणराव कुटे ,बाजीराव पा.खेमनर,कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात,  ॲड. आर.बी .सोनवणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed